वडीगोद्री : पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शनिवारी अंतरवाली सराटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ठराव घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या वेळी मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, माझे उपोषण सुरू झाले आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. माझ्या उपोषणाला प्रशासनाने नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे; परंतु तरीही मी उपोषण करणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची जबाबदारी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाची आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाच्या तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्यांसाठी हे मंगळवारी उपोषण सुरू करण्यात आले आहे, असे सांगून ते म्हणाले की, उपोषण करू नये, यासाठी सरकारकडून कारस्थान रचले जात आहे.
सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे, नाही तर विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे केले जातील. सर्व आमदारांना विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या नेत्यांना आरक्षण देण्याबाबत सांगावे नाहीतर उद्या आम्हाला सांगू नका, असेही मनोज जरांगे-पाटील म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला गावातूनच विरोध करण्यात आला होता. याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
शनिवारी ग्रामपंचायतीची विशेष बैठक बोलवण्यात आली. या वेळी उपोषणाचा ठराव घेण्यात आला. त्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या बाजूने ५ तर विरोधात ५ सदस्यांनी मतदान केले. त्यानंतर सरपंचांनी आपले निर्णायक मत मनोज जरांगे-पाटील यांच्या बाजूने दिले. अंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या वेळी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता