मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीविषयी भाष्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पलटवार केला होता. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक होते असे फडणीस म्हणाले होते. आता त्यांना संजय राऊतांनी सडेतोड शब्दांमध्ये उत्तर दिले आहे. भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हा सेनेचे आमदार-नगरसेवक निवडणूक आले होते असे म्हणत हे सर्व तुमच्या जन्मापूर्वीचे आहे असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाचा जन्म हा १९८० च्या दशकात झालेला आहे जनता पक्षाचं पतन झाल्यावर आणि शिवसेनेचा जन्म हा १९६९ चा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर या मुंबईत शहरात डॉ. गुप्ते हे कधी झाले, त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत ठेवू. जर कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या. शिवसेनेचे पहिले आमदार वामराव महाडिक हे देखील त्याच काळात निवडून आले, शिवसेनेच्या स्थापनेनंतर. गिरगावातून प्रमोद नवलकर हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावामधून छगन भुजबळ हे निवडून आले होते. आमचे वाघ मुंबईतून अनेकदा निवडून आलेले आहेत. भाजपाच्या जन्माच्या अगोदर. आता देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी फारसा संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल कारण या सगळ्या गोष्टी फडणवीस यांच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत.”
तसेच, रामजन्मभूमी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, “ते काहीही म्हणत असले, कोणी काहीही म्हणत असलं तरी इतिहास आहे. दस्तावेज आहेत. रेकॉर्ड्स आहेत. सीबीआय न्यायालयासमोर जे विशेष न्यायालय निर्माण झालं, त्याच्यासमोरील साक्षी-पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना आरोपी आणि गुन्हेगार केलं होतं त्यामध्ये. लालकृष्ण अडवाणीबरोबर बाळासाहेब ठाकरे हे त्यातले आरोपी आहेत. मग ते कोर्ट मूर्ख होतं का? शेकडो कारसेवक मुंबईतून गेले. त्यांना तेव्हा कोणताही राजकीय पक्ष नव्हता. आमचे अनेक प्रमुख लोक तेव्हा इथून गेले होते. तुम्ही जर त्या काळातील सामना पाहिलात तेव्हा कोण कोण कुठून निघालंय, याची यादीच आम्ही दिली होती. संपूर्ण नियोजन हे मुंबईतून होत होतं. तेव्हा आता कोणालाही काही एक वेगळी माहिती द्यायची असेल, मात्र अशी कितीही माहिती पसरवली तरी लोकाचा विश्वास बसणार नाही. कारण, अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचं योगदान हे एक ऐतिहासिक कार्य आहे. इतकच कशाला तर जेव्हा रामजन्मभूमीचा हा लढा थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो होतो आणि वातावरण परत एकदा जागृत केलं व सरकारला जाग आणली. उद्धव ठाकरे तिकडे दोन वेळा गेले, एकाद मुख्यमंत्री असतानाही गेले, त्याच्या अगोदरही गेले. आम्ही वारंवार जात असतो. त्यामुळे अयोध्येशी आमचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे.”
तर, “ तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते.” असं देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाला आणि संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं होतं.