अमरावती (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही? हे भविष्यातील सांगता येणार नाही, असे महत्वपूर्ण विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्योजक गौतम अडाणी यांच्यावर कर्ज बुडविल्याप्रकरणी जेपीसी गठित करण्याच्या मागणीविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हणाले, जेपीसी हे सोल्युशन नाही. जेपीसी समितीत २१ जणांनी समिती असणार आहे. यात १५ सत्ताधारी तर सहा विरोधी पक्षाचे खासदार असतील. समितीचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे राहणार आहे. त्यामुळे या समितीचा काय निर्णय येईल, हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणून जेपीसी नव्हे तर त्याऐवजी सर्वेाच्च न्यायालयाची समिती प्रभावी राहील, ही भूमिका मांडली. तरीही सहकारी पक्षांनी जेसीपीची मागणी केल्यास त्यांच्याबरोबरच असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याच्या वृत्तालाही दुजोरा !
दरम्यान, कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहे. या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचे शरद पवार यांनी दुजोरा दिला.
अजित पवार, पक्षफोडीवरही शरद पवारांचे महत्वाचे विधान !
राज्यात सध्या फोडाफडीचे राजकारण सुरू आहे. यावर देखील शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं मत व्यक्त केले आहे. अजित पवार यांना फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्यावर विचारताच पवार यांनी याला नकार दिला नाही. परंतू कोणी राष्ट्रवादी पक्ष फोडायचे काम करत असेल तर ती त्यांची रणनीती असेल, त्यांची भूमिका असेल. आम्हाला काय भूमिका घ्यायची ते आम्ही तेव्हा घेऊ, असे वक्तव्य शरद पवार यांनी करत विरोधकांना एकप्रकारे ईशाराच दिला आहे.