जळगाव (प्रतिनिधी) घराजवळ असलेल्या गरबा कार्यक्रमात सर्वांना चॉकलेट वाटले. त्यानंतर मित्रांना मला शेवटचं घरी सोडून द्या, असे म्हणत एकाने तरुणाला घरी सोडले. त्यानंतर विशाल तुकाराम चौधरी (वय २८, रा. अयोध्या नगर) या तरुणाने किचनमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. किचनमध्ये गेलेल्या पत्नीला पतीचा लटकेला मृतदेह दिसताच तीने हंबरडा फोडीत आक्रोश केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अयोध्या नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नेमकं काय घडलं !
विशाल गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीतील सुप्रीम पाईप कंपनीत नोकरीला होता. शुक्रवार रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात विशाल सहभागी झाला होता. याठिकाणी त्याने गरबा खेळणाऱ्यांसह लहान मुलांना चॉकलेट वाटले. त्यानंतर तो एका जणाच्या दुचाकीवरून घरी गेला. घरी गेल्यानंतर घरात कोणीही नसतांना त्याने किचनमध्ये दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर विशाल याची पत्नी हर्षाली या किचनमध्ये गेल्या असता, त्यांना पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी पतीचा मृतदेह बघताच हंबरडा फोडीत आक्रोश केला.
कारण अस्पष्ट !
परिसरातील नागरिकांनी त्यांच्याघराकडे धाव घेतली. विशालचा मृतदेह खाली उतरवित त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले. विशाल याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला?. याचे कारण नातेवाईकांसह कुटुंबियांना समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ आकाश परदेशी करत आहे. विशालच्या पश्चात आई सुषमा, वडील तुकाराम, भाऊ चिराग, पत्नी तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
शेवटचं धन्यवाद वाक्य ठरले अखेरचे !
गरब्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विशाल याने आपल्या मित्रांना मला शेवटच घरी सोडून द्या, असे म्हणाला. त्यानंतर तेथील एका मुलाने विशालला दुचाकीने त्याच्या घरी सोडल. त्या मुलाला देखील विशाल हा शेवटच धन्यवाद म्हणून घरात गेला. आणि त्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच विशालच्या मित्रांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.