जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या निवासस्थानासमोर मध्यरात्री अज्ञातांनी पेंटिंग करत खासदार उन्मेष पाटील यांना धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आमदार सुरेश भोळे व त्यांचा मुलगा विशाल भोळे यांच्या लक्षात येताच आंदोलकांनी तेथून पळ काढलाय.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर काळी रांगोळी काढली होती. दरम्यान, या आंदोलनाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र, सुरेश भोळे यांच्या घरासमोर काढण्यात आलेल्या पेंटिगबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याने जबाबदारी घेतलेली नाही.
खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी
मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास आमदार भोळे यांच्या घरासमोर सात ते आठ जणांनी येवून काळया शाईने लिहण्यात आले. तसेच खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. हा प्रकार आमदार सुरेश भोळे व त्यांचा मुलगा विशाल भोळे यांच्या लक्षात आल्यानंतर ते बाहेर आले मात्र ते आल्यानंतर आंदोलकांनी पळ काढला. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळेतच पोलीस कर्मचारी याठिकाणी हजर झाले. मात्र, तोपर्यंत त्या ठिकाणी सर्वांनी पळ काढला होता. खासदार उन्मेष पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, त्यांना अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे.