सांगली (वृत्तसंस्था) इस्लामपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार करून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, पीडित तरुणाचा अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करत ब्लॅकमेल केल्याचा प्रकारही घडलाय. याप्रकरणी विकृत पोलीस कर्मचारी हणमंत देवकर याला अटक करण्यात आली आहे.
इस्लामपूर शहरामध्ये २७ ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास इस्लामपूर पोलिसांची गस्त सुरू असताना इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हनुमंत देवकर एका अन्य पोलिस कर्मचाऱ्याला एक महाविद्यालयीन तरुण आढळून आला. त्याच्याकडे देवकर यांनी चौकशी केली असता सदर तरुणाने आपल्या मैत्रिणीला भेटून आपल्या वस्तीगृहावर जात असल्याचे सांगितले. यावर पोलीस कर्मचारी देवकर याने सदर तरुणाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्याला सोडून दिले होते. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी देवकर याने सदर तरुणाला गाठून त्याच्या मैत्रीणी बरोबर असणारे संबंध त्याचा व संबंधित तरुणीच्या घरच्यांना सांगण्याची धमकी देत, त्याच्याकडून ४ हजारांची खंडणी घेतली. त्याचदिवशी दुपारच्या सुमारास त्या तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच तरुणावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ देखील देवकर यांनी काढला. त्यांनतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाकडे पुन्हा खंडणी देखील मागण्याचा प्रयत्न केला. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी असणाऱ्या हणमंत देवकर (वय ३४ वर्ष) याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी हणमंत देवकर अटक केली आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांनी दिली आहे. दरम्यान नराधम पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्यामुळे सांगली पोलीस दलाच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचा प्रकार घडला आहे.