जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहा आघाडी नोंदणीचे प्रस्ताव नगरपालिका विभागाकडे प्राप्त झाले आहेत. पालिका विभागाने हे प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत. थोडक्यात आघाडी नोंदणी केलेल्या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राजकीय पक्षासह आघाडीच्या चिन्हांवर देखील लढल्या जाऊ शकतात.
जाणून घ्या…आघाडी आणि त्यांच्या अध्यक्षांची नावे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मागील दीड वर्षाच्या सहा आघाडींची नोंदणी झाली आहे. त्यात सुराज्य परिवर्तन आघाडी (टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) अध्यक्ष प्रतिभा मंगेश चव्हाण, एकता जनशक्ती विकास आघाडी (सावदा) अध्यक्ष फिरोज खान हबीबबुल्ला खान पठाण, दारा मोहम्मद आघाडी (डी.एम, रावेर) अध्यक्ष आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, फैजपूर शहर विकास आघाडी (फैजपूर) अध्यक्ष विजय मधुकर फिरके, मीना आघाडी (भुसावळ) अध्यक्ष शेख शरीफ शेख हसन, महाराष्ट्र जनविकास आघाडी (धरणगाव) अध्यक्ष राजेंद्र किसन महाजन यांचा समावेश आहे.
निवडणुका कधी ?
राज्यात शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन आता महिना उलटला आहे. परंतू अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. दुसरीकडे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि 2017 च्या वॉर्डरचनेप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. दुसरीकडे शिवसेना कुणाची? यावर अद्याप कोर्टातून निर्णय आलेला नाहीय. तर शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आमचे?, यावर निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने आपापला दावा केलेला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र कशा लढणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप-शिंदे गटाला आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणे सोपे जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातही अनेक ठिकाणी आघाडी नोंदणी झाल्याचे कळतेय. तर दुसरीकडे पालिका निवडणुका दोन आठवड्यात घ्या, निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला २० जुलै रोजी दिले आहेत. परंतू अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या आहेत.