नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीचे मतदान संपुष्टात आल्यानंतर जाहीर झालेला ‘एक्झिट पोल’ हा ‘मोदी मीडिया पोल’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो काल्पनिक पोल आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. यंदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीला २९५ जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर, मीडियाचा ‘एक्झिट पोल’ बनावट आहे. निवडणुकीतील गैरप्रकार योग्य ठरवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा एक प्रयत्न व ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मानसशास्त्रीय खेळी असल्याची टीका काँग्रेसने केली.
नवी दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी ‘इंडिया’ आघाडीला किती जागा मिळणार? असा सवाल केला असता ते म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे आमच्या आघाडीला २९५ जागा मिळणार आहेत. लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचे ‘२९५’ गीत तुम्ही ऐकले असावे. त्यानुसार, ‘इंडिया’ आघाडी एवढ्या जागा खिशात घालणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
या पत्रकार परिषदेत काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले की, नव्या सरकारच्या १०० दिवसांच्या अजेंड्याची समीक्षा करणे व सखोल विचारमंथन करण्यासाठी मोदी बैठका घेत आहेत. पण, हा नोकरदार व प्रशासकीय व्यवस्थेला एक संकेत देणे आणि आम्हीच सत्तेत येत असल्याचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपणच पुन्हा पंतप्रधान बनणार असल्याची मोदींची ही मानसशास्त्रीय खेळी आहे. पण, मतमोजणीची प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडली जाईल व मतमोजणी करणारे सेवक अशा हातखंड्यांना घाबरणार नाहीत, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
एक्झिट पोल बनावट आहे. जो व्यक्ती ४ जूनला सत्तेतून बाहेर जाणार आहे ? तोच व्यक्ती एक्झिट पोलचे आकडे समाजमनावर बिंबवत असल्याची टीका रमेश यांनी मोदींवर केली. गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच १५० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, ‘एक्झिट पोल’चे वस्तुस्थितीशी काहीही देणे-घेणे नाही. काही राज्यांत लोकसभेच्या जागांपेक्षा अधिक जागा भाजपला मिळणार असल्याचे दाखवले आहे. पण, ‘इंडिया जनबंधन’ कोणत्याही स्थितीत २९५ जागा जिंकणार असल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.