नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना आता यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा मिनी यूपीए असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सरकार उत्तम काम करतंय. सरकार सुरळीत चालण्यासाठी वेळोवेळी पक्षातील नेते बैठका होत असतात. समन्वय साधून आम्ही काम करतोय. सरकारच्या कामकाजावर आम्ही चर्चा करतोय, असे संजय राऊत म्हणाले. आगामी काळात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहे. त्यासंदर्भात चाचपणी होऊ शकते. गोवा आणि यूपीत काँग्रेससोबत निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. एक प्रकारे ही महाष्ट्रातील महाविकास आघाडी ही ‘मिनी यूपीए’च आहे. पण शिवसेनेचा यूपीएत सहभागी होण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. यूपीए आघाडी बळकट व्हायला पाहिजे आणि अधिकाधिक पक्षांनी त्यात सहभागी व्हावं, हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा जसा विचार आहे, तसाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही विचार आहे, असे संजय राऊत म्हणाले.