जळगाव (प्रतिनिधी) भु-विकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांकरीता शासन निर्णय दि.२४ जुलै, २०१५ नुसार एकरक्कमी कर्ज परतफेड (ओ.टी.एस) योजना लागू केलेली होती. (दि.२०ऑक्टोबर,२०२०) रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतंर्गत कर्ज परतफेडीसाठी (दि.३१मार्च,२०२१) पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर सक्तीच्या वसुलीव्दारे जमीनलिलाव करुन वसुलीची कार्यवाही केली जाणार आहे. असे अवसायक, जळगाव जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली., जळगाव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्हा भु-विकास बँकेचे जिल्ह्यातंर्गत 176 सभासदांनी या योजनेचा लाभ घेतल्यास जळगाव जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांना 1 कोटी 67 लाख वसुल भरावा लागेल. यामध्ये शेतक-यांना 5 कोटी 85 लाख रुपयांच्या व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सभासदांना लाभ मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी 31 मार्च, 2021 च्या आत कर्जाची परतफेड करावी. अन्यथा बँकेमार्फत सक्तीच्या वसुलीव्दारे कार्यवाही करण्यात येईल.
तरी शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी परतफेड योजनेचा लाभ घेवून आपले शेतजमीनी वरील बँकेचा बोजा कमी करुन घेण्याचे आवाहन श्री. स.सु. बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.