जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, जळगाव (Jalgaon) शहरात कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चार जणांचा बळी (4 died due to cold weather) गेला आहे. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, संबंधित चारही जण जळगाव शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होते. सोमवारी रात्री ते शहरातील विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे.
संबंधित चारही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चारही जणांना मृत घोषित केलं आहे. मृत व्यक्ती नेमके कोण? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. संबंधितांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
थंडगार जमीन आणि अंगावर पुरेसं पांघरूण नसल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपलेले हे चौघे मरण पावले असावे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु यांचा शवविच्छेदन अहवाल येणं अद्याप बाकी आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
















