मुंबई (वृत्तसंस्था) सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कुठेही धमकीची भाषा वापरली असं मला वाटत नाही. पण फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे, असं विधान त्यांनी केलं होतं. ही भाषा भयंकर धमकीची होती. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पाहत होतात का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
“महाविकास आघाडी सरकारला वर्ष झालं आहे. लोक वर्षपुर्ती आपल्या पद्धतीने साजरी करत आहेत. विरोधी पक्षानेही आपल्या पद्धतीने आमच्या सरकारची वर्षपुर्ती साजरी केली असंच मी मानतो. सामनामधली मुलाखत देवेंद्र फडणवीस यांनी वाचली आणि पाहिली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा नेमकी कुठे वापरली यावर अंडरलाइन केलं असतं तर मला त्यावर उत्तर देता आलं असतं. पण त्यांनी असं काही सांगितलंच नाही. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधकांच्या कुंडल्या हातात घेऊन बसलो आहे अशी भाषा केली होती. त्यांची अशी अनेक वक्तव्यं माझ्या स्मरणात आहेत. जर एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागत असेल तर त्यांना उत्तर देणं मुख्यमंत्र्यांचं काम आहेच.” खोटेपणा करुन विरोधकांनी आरोप करु नये असंही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.
एक वर्षात काय केले? पुढची दिशा काय? यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले. नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्यं वर्षपूर्तीला करायची? मुख्यमंत्र्याची मुलाखत मला वाटली नाही. खरं तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही.