मुंबई (वृत्तसंस्था) ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भातील बातम्यांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की व धमक्या दिल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीये. एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय,’ असं फडणवीस म्हणाले.
पोलिसांच्या अरेरावीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ‘पत्रकार हे त्यांचं काम करत असतात. शिवाय लालबागमध्ये गेलेल्या पत्रकारांकडं अधिकृत पास होते. सर्व नियमांचं पालन करून ते काम करत होते. असं असतानाही त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली हे निषेधार्हच आहे. तो व्हिडिओ मी स्वत: पाहिला. ‘हात काय, पायही तोडू’ असे डायलॉग काही पोलीस अधिकारी मारताना त्यात दिसत आहेत. हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे. खरंतर तिथं गर्दी झाली होती अशातलाही काही भाग नाही. त्यामुळं इतकी दंडुकेशाही योग्य नाही. ह्या दंडुकेशाहीच्या जोरावर कुणी कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर बरं नाही,’ असं फडणवीस म्हणाले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे, पण त्या आधी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.
फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला. ‘गेल्या दोन वर्षांमध्ये माध्यमांवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न होतोय. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी अटक करायची तर कधी आणखी काही कारवाई करायची. एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय,’ असं फडणवीस म्हणाले.
नेमकं काय घडलं?
लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.