मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून आम्ही पुढे निघालो आहोत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.