धुळे (प्रतिनिधी) विधानसभा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला १२३ जागा मिळाल्या. राज्यामध्ये पाच वर्ष सरकार चालविल्यानंतर जागा वाढण्याऐवजी विधानसभेच्या एकूण १८ जागा गमवाव्या लागल्या. खरेतर, भाजपाच्या या पुच्छप्रगतीला देवेंद्र फडणवीसांचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत ठरला, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून सुनावले आहे.
अधीवेशनाच्या समाप्तीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआघाडीचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दुर्योधनाची उपमा देवून सत्तेच्या लालसेत आपले किती अध:पतन झाले याचा परिचय दिला. महाविकास आघाडीला कौरवसैन्य असे संबोधले. या पार्श्वभुमीवर त्यांना समजणाऱ्या शब्दातच उत्तर दिले पाहिजे असा कार्यकर्त्यांनी हट्टच धरला. विधानसभेच्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला १२३ जागा मिळाल्या. राज्यामध्ये पाच वर्ष सरकार चालविल्यानंतर जागा वाढण्याऐवजी विधानसभेच्या एकूण १८ जागा गमवाव्या लागल्या. खरेतर, भाजपाच्या या पुच्छप्रगतीला देवेंद्र फडणवीसांचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत ठरला. भाजपाला विधान सभेच्या ८०-८५ जास्त जागा मिळणे शक्य नव्हते. अन्य पक्षातुन आणलेल्या परितक्त्यांशी मोहतर लावुन भाजपाचा टिळा लावून सौभाग्य बहाल केले. अर्थात यातील बहुतेक सर्व नेते आपआपल्या मतदार संघात स्वतःची शक्ती राखून होते. आहेत! बेडूक उड्या मारणान्यांपैकी अनेकांचे माझे व्ययक्तीक संबंध आहेत. त्यांच्यामागे सी.बी.आय., ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर अशा दिल्ली नियंत्रित संस्थांचा सर्रास दुरूपयोग केला. अश्या २०-२५ आमदारांमुळे भाजपा रडतखडत का होईना पण १०५ पर्यंत पोहचली. फडणवीसांना ‘सत्तासुंदरी’ खुणावत असतांना सत्तासुंदरीने वरमाला म. वि. आघाडीच्या नेत्यांच्या गळ्यात घातली. दगलबाजी करण्याची अंगभुत सवय असलेल्या तसेच पक्ष नेतृत्वाने वायफळ लाड केल्यामुळे वाया गेलेल्या देवेंद्र फडणवीसांशी संबंध ठेवायचाच नाही. असा ठाम निर्धार करुन महाविकास आघाडीची स्थापना झाली. अविश्वासार्ह्य वाटणारे तीन पक्षाचे सरकार सत्तेत आले. सरकार स्थापन होताच भाजपाच्या सर्वच नेत्यांनी उर बडवून घ्यायला सुरूवात केली. ऐन तारुण्यातच वैध्यव्य आल्याने भाजपाचे आघाडी सरकार विरुध्द आंकाड तांडव करायला सुरूवात केली. हे अरण्यहृदन अपेक्षीतच होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते गावोगाव आहेत. भाजपाची शाऊटींग ब्रिगेड मिडीयावर जेवढे विष ओकत होती तेवढेच सत्तेतील सहभागी पक्षाचे कार्यकर्ते आप आपसातील मतभेद विसरून दिवसेंदिवस एकत्र येत होते. राज्यातील आपले सरकार जास्तीत जास्त मजबुत कसे होईल या प्रयत्नास सर्वच कार्यकर्त लागले. अशा राजकीय पार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे यांना ‘दुर्योधन संबोधणे हे राज्याच्या ग्रामीण भागात अजीबात सहन केले जाणार नाही. उलट आपल्याला मुख्यमंत्री होता आले नाही, ‘वरमाला घेवून उभ्या असलेल्या सत्तासुदंरीने आपल्याला अव्हेरून दुसऱ्याच्याच गळ्यात वरमाला घातली’ फडणवीसांच्या हृदयाला झालेली खोल जखम मविआडी सरकारचे स्थापन १८ महिने उलटून गेले. मध्यंतरीच्या कालखंडात, फडणवीसांच्या जखमेवर साधी खपली सुध्दा धरू शकली नाही. हीच फडणवीसांच्या अतृप्त आत्म्याला शांती आणि समाधान लाभू देत
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभापूर्वीच नेहमीच्या लबाडांच्या आधारावर सरकारचे काही खरे नाही असे वातावरण तयार केले भरपुर दारू गोळ्याची रसद तैनाती फौजेला दिली. त्यांच्या दुर्दैवाने काही उपयोग झाला नाही. सर्व फटाके फुसके निघाले.
दिल्लीतील मालकांना भरपूर अश्वासन, बाता मारून झाल्या. अतिशयोक्तीपूर्ण स्वप्ने दाखविली. अखेरीस कसलेल्या योध्यांनी फडणवीसांना त्यांच्याच चक्रव्युहात व्यवस्थितपणे व बेमालूमपणे अडकवून ‘अभिमन्यु’ केला. भाजपाचे राज्यात अक्षरशः वस्त्रहरण झाले. ‘फेस सेव्हींगसाठी अपेक्षेप्रमाणे फडणवीसांनी, ईडीची शिडी वापरून उंटाच्या ढूंगणाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांच बरं आहे. आधी लफडी करायची, अंगाशी आलं की, गेलेली अब्रु वाचविण्यासाठी सी.बी.आय., ईडीच्या गोधड्यांचा आश्रय घ्यायचा! नाथाभाऊ खडसे, सौ वहिनीसाहेब, त्यांचे जावई किंवा कुटूंबीय यांच्याविरूध्द सुरू असलेली केंद्रीय तपास पथकांची कारवाई ही अन्य काही नसून आपल्याच गेलेल्या अब्रुवर पांघरूण टाकण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे. सभागृहात भाजपाचे झालेले हसे सावरण्यासाठी बिचाया नाथाभाऊंना अकारण त्रास देऊन महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा हा बालीश प्रयत्न आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवूनसुध्दा किमान समज येऊ नये, हे त्यांचे दुर्देवचं व आमचे सुदैव! अशी बोचरी टीका अनिल गोटेंनी आपल्या पत्रकात केली आहे.
अत्यंत अहंकारी, हलक्या कानाचा, कपटी व धांदात खोटेच बोलण्याच्या स्वभावाने फडणवीसांचा घात केला. त्यातच १०-१२ खुषमष्क-यांच्या वेढ्यातून सुटता येत नाही. त्यांच्या संशयी स्वभावामुळे मोकळेपणाने बाहेर फिरूही शकत नाहीत. मनामध्ये कपट ठेवून आपल्याच सहकाऱ्यांचे गळे कापण्याच्या सवयीमुळे त्याच चष्म्यातून समोरच्या व्यक्तीचे फडणवीस मुल्यमापन करतात. अशा अवसान घातकी व आत्मघात करून घेण्याच्या जबरदस्त शक्तीमुळेच सर्व अनुकूलता असतांनासुध्दा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचता येवू शकले नाही. माझे हे शब्द उकळते तेल कानात टाकल्याप्रमाणे भासतील. पण सत्य कितीही कटू असले तरी सांगितले पाहीजे. म्हणूनच पुढील दूसरे सत्य आज सांगतो की, ‘फडणवीसांची सत्ता लोलूपता व विरोधकांचा सूड घेण्याची आसुरी वृत्ती सोडली नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाची अवस्था केविलवाणी झाल्याशिवाय राहणार नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाला बाहेरच्या शत्रूची अजिबात आवश्यकता नाही. राजकारणातील दुर्योधन, धृतराष्ट्र, शकुनीमामा या सर्व भुमिका ते स्वतःच ‘मी पुन्हा येईन’ या एकपात्री प्रयोगात वठवीत आहेत. त्यांच्या आमदारांची संख्याही १०६च आहे. शिशुपालची १०५ पापे पूर्ण झाली आहेत. याचा त्यांनी विचार करावा. ऐवढेच मी त्यांना जुना व प्रामाणीक सहकारी म्हणून समजावू शकतो. घोड्याला पाण्याजवळ नेता येईल पण, पाणी प्यायचे की नाही हे घोड्यालाच ठरवायचे आहे. असे खडे बोल सुनावणारे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल अण्णा गोटे यांनी आज प्रसिध्दीस दिले आहे.