जळगाव (प्रतिनिधी) माती परीक्षण करण्याच्या फायद्यांसोबतच त्याचे महत्त्व, मातीचा नमुना केव्हा, कधी, कुठे, कसा घ्यावा याचे तांत्रिक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. कारण माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते व पुढील पीक नियोजन करता येते.
माती परीक्षण म्हणजे शेतातील प्रातिनिधिक नमुन्यांचे पृथक्करण करून त्यातीत उपलब्ध मुख्य दुष्यम व सूक्ष्म द्रव्यांचे प्रमाण तपासून अहवालानुसार पिकाचे व खतांचे नियोजन करणे होय. माती परीक्षण अहवालावरून जमिनीचा कस, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यासोबतच जमीन आम्लधर्मी, क्षारयुक्त किंवा चोपण आहे याचे निदान करता येते. एकंदरीत माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते.
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी दिल्यास पिके चांगली येत नाहीत. अन्नद्रव्ये प्रमाणापेक्षा जास्त दिल्यास सुपीकतेवर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणाम पिकाच्या वाढीवर दिसून येतात आणि खर्चही वाढतो. जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व त्यावरून कोणते खत वापरावे किती खत वापरावे. कोणते पीक घ्यावे ही माहिती आपल्याला माती परीक्षण केल्याने समजते. माती परीक्षणाचे निष्कर्ष योग्य येण्यासाठी आपल्या शेताचा प्रातिनिधिक मृद नमुना घेणे ही माती परीक्षणातील प्राथमिक परंतु अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
माती परीक्षणाचे फायदे-
माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. जमीन आम्लधर्मी आहे किंवा विम्लधर्मी आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते. माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करता येतो त्यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते. माती परीक्षणामुळे पिकाच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते.
मातीचा नमुना केव्हा घ्यावा ?
मातीचा नमुना साधारणत: पिकाची कापणी झाल्यानंतर घ्यावा. खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये. शेतात पीक असताना मातीचा नमुना दोन ओळींच्या मधल्या जागेतून घ्यावा. मातीचा नमुना घेण्यासाठी आवश्यक साहित्य टिकाव,फावडे,खुरपे,घमेले किंवा गिरमिट, स्वच्छ गोणपाट कापडी पिशवी.
मातीचा नमुना कसा घ्यावा ?
मातीचा नमुना घेताना जमिनीचा रंग, उंच, सखलपणा, पोत, खोली याबाबींचा विचार करावा. सर्वसाधारणपणे पिकासाठी जमीन जर एकसारखी असेल तर दोन हेक्टर जमिनीतून 10 ते 12 ठिकाणचे माती नमुने घेऊन त्यातून एका मातीचा प्रातिनिधिक नमुना तपार करावा. एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन असल्यास प्रत्येक प्रकाराच्या जमिनीतून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
माती नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये !
जनावरे बसण्याची जागा, खत, काडीकचरा टाकण्याची जागा,बांधावरील माती, कंपोस्ट खड्ड्याची जागा, पाण्याच्या पाटावरील जागा, विहिरी जवळील जागा, दलदलीची जागा.
माती नमुना तपासणी प्रकार व तपासणी फी –
साधा माती नमुना तपासणी ३५/-, सुक्ष्म अन्नमूलद्रव्य माती नमुना तपासणी २००/-, विशेष अत्रमुलद्रव्य माती नमुना तपासणी २७५/-.
मातीचा नमुना घेण्याची पद्धत-
मातीचा नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा दगड इ. हाताने बाजूला करावेत. नमुना घेण्यासाठी टिका किंवा फावड्याने एक द्रोण आकाराचा किंवा इंग्रजी “V” आकाराचा खड्डा करावा. खड्डयाच्या एका बाजूची 2-3 सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरवडून घ्यावी. अशा रीतीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात एकत्र करावेत. मातीतील काडीकचरा, दगड बाजूला करून ती चांगली मिसळावी व स्वच्छ गोणपाटावर घ्यावी. गोणपाटावर मातीचा ढीग करून चार समान भाग करावेत. या समान चार भागामधून समोरासमोरीत दोन भाग काढून टाकावेत.
उरलेल्या दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करून परत दोन भाग काढून टाकावेत. याप्रमाणे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत वरील क्रिया करावी. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी वाळविलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.
मातीचा नमुना कोठे व कसा पाठवावा !
मातीचा नमुना घेतल्यानंतर माती परीक्षण नमुना चिठ्ठीवर माहिती लिहून लवकरात लवकर नजीकच्या शासकीय / अशासकीय नोंदणीकृत माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. माती परीक्षण नमुना चिठ्ठीवर खालील माहिती लिहावी. शेतकऱ्याचे नाव, नमुन्याचा क्रमांक, सर्वे नंबर गट नंबर, माती नमुना घेतल्याची तारीख, नमुना घेतलेल्या जमिनीचं एकूण क्षेत्र (एक हेक्टर), जमिनीचा उतार (जास्त /मध्यम/ खोल), बागायत, कोरडवाहू, जमिनीचा रंग भुरकट काळी, मागील वर्षी घेतलेल्या पिकाचे नाव, पुढील हंगामात कोणते पीक घेणार आहे त्याचे नाव असावे.
अधिकच्या माहितीकरीता आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. असे अहवान संजय हिंमतराव पवार, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.