जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका शेतकऱ्याला ४० लाखाचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळवून देण्याचे आमिष दाखवून १८ लाख ४९ हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर सेलला गुन्हा दाखल होता. याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याआधी दिल्ली येथील दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी संदीप विठ्ठल महाजन (वय ४६) यांना दूध डेअरी सुरू करण्यासाठी ७५ लाख रुपयांचे कर्ज हवे होते. याबाबत त्यांनी पाचोरा येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेत जाऊन कर्जाबाबत विचारणा केली होती. परंतू बँकेने त्यांना कर्ज देण्यास नकार दिला होता. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये श्री.महाजन यांना मुंबई येथील बजाज फायनान्स ऑफिस मधून कबीर अग्रवाल बोलत असल्याचे सांगून तुम्हाला लोन अगेन्स्ट पॉलिसी मिळू शकते, असे सांगितले. तसेच त्यासाठी तुम्हाला चार लाख रुपयांची बजाजची पॉलिसी काढावी लागेल. परंतु पॉलिसीचे सर्व फायदे आम्ही घेऊ आणि त्या बदल्यात तुम्हाला ४० लाख रुपयाचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने देऊ असे सांगितले. त्यानंतर आरोपीने वेळोवेळी दिल्लीतील चार बँक खात्यांमध्ये १२ लाख ४९ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले. तसेच श्री. महाजन यांना कर्ज मंजूर झाल्याचे सांगून त्यांच्याकडून मुंबई येथे रोख स्वरूपात ६ लाख, असे १८ लाख ४९ हजार रुपये घेतले. परंतू आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्री.महाजन यांनी ६ सप्टेंबर २०२० रोजी सायबर पोलिस स्थानकात भादवि कलम ४२०,४६७,४७१,३४ सह ६६ (ड)प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवायला सुरुवात केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने, पोहेका प्रवीण वाघ, पो.ना दिलीप चिंचोले, पोहेका दीपक सोनवणे, पोहेका. अरविंद वानखेडे, श्रीकांत चव्हाण असे एक शोध पथक तयार केले. तसेच त्यांना २० फेब्रुवारी रोजी दिल्लीला रवाना केले. सदर पथकाने दिल्ली व गाजियाबाद येथे आरोपींचा तीन दिवस शोध घेतला. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी सापळा रचून गीता कॉलनी या भागात सतिंदर सिंग पिता तार लोक सिंग (रा. दिल्ली) व दीपक गुप्ता पिता सत्यप्रकाश (रा. दिल्ली) यांना अटक केली होती. या कामात पोहेका नरेंद्र वारुळे यांनी तांत्रिक मदत केली. दोघा आरोपींना त्यावेळी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आले होते. तर आरोपींनी श्री.महाजन यांना मुंबई येथून फोन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पीएसआय अंगद नेमाने, पोहेका गौरव पाटील, पोहेका ललित नारखेडे हे मुंबईला गेले आणि तेथून अली मोहम्मद मुमताज (रा. श्रीराम पाडा भांडुप वेस्ट), अविनाश हनुमंत वांगडे (मोरजकर नगर ठाणे) रविराज शंकर डांगे (रा. विश्वशांती को.सोसायटी मुलुंड) यांना अटक केली आहे. या आरोपींकडून ४ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पथक करीत आहे.