धुळे (प्रतिनिधी) वीज वितरण विभागातर्फे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) विजेअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ईश्वर थोरात या शेतकऱ्याने केला आहे. महावितरणच्या याच त्रासाला कंटाळून साक्री तालुक्यातील इच्छापुर गावातील मोबाईलच्या टॉवरवर चढून या शेतकऱ्याने शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन केले आहे.
दिवसा देखील अधून-मधून विज पुरवठा खंडित होत असून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये रात्रभर जागून तसेच जीव मुठीत धरून शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. त्यातच साक्री तालुक्यामध्ये बिबट्या तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वीज वितरण विभागातर्फे रात्रीच्या वेळीच वीज पुरवठा सुरळीत केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. यामुळे हिंस्र प्राण्यांचा सामना देखील करावा लागण्याची भीती शेतकऱ्यांसमोर असते.
महावितरणचे आश्वासनाने आंदोलन मागे
या शेतकऱ्याने यापूर्वी देखील वीज वितरण विभागाच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांना याबाबतची कैफियत मांडली. परंतु वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या शेतकऱ्याने टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्याचा निश्चय केला. अखेर वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्याने आपले आंदोलन मागे घेत टॉवरवरून खाली उतरून आपले आंदोलन थांबवले आहे.