छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) काकांच्या अंत्यविधीसाठीचा कार्यक्रम आटोपून परत येतांना समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चौघं भाऊ ठार झाल्याची दुर्दैवी आज पहाटे (दि २४) घडली.
संजय राजणभाई गौड (वय ४३), कृष्णा राजणभाई गौड (वय ४४), श्रीनिवास रामू गौड (वय ३८), सुरेशभाई गौड (वय ४१.सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) असे अपघातात मयत झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत. या अपघातात सुदैवाने एक मुलगा बचावला आहे. गौंड कुटुंबीय सुरतचे रहिवासी आहेत. सुरतला त्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. गौड कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा तेलंगणा येथे मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडं अर्टिगा या चारचाकी वाहनाने दोन दिवसापूर्वी गेले होते.
अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडं काल रात्री सुरतकडे घरी निघाले होते. समृद्धी मार्गाने जात असतांना आज पहाटे ३ च्या सुमारास करमाड – शेकटा येथे त्यांच्या कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अपघात एकाच कुटुंबातील चौघं भाऊ ठार झाल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.