जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वैमनस्यातून दोन जीवलग मित्रांमध्ये चाकूहल्ला झाल्याची घटना समोर आली असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
मृत युवकाचे नाव धीरज हिवराळे (वय २७) असून, हल्लेखोर कल्पेश चौधरी (वय २५) हा देखील या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पूर्वी अतिशय जवळचे मित्र होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी एका नातेवाईकाला शिवीगाळ केल्याच्या वादातून दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती.
रविवारी सकाळी पुन्हा एकदा वाद उद्भवला आणि बाचाबाचीचे रूप हाणामारीत बदलले. या झटापटीत दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. कल्पेश चौधरीने धीरजच्या पाठीत वार करत त्याला गंभीर जखमी केलं. धीरजला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, कल्पेशचाही या हाणामारीत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.