जळगाव (प्रतिनिधी) मुलाला भेटण्यासाठी आलेल्या जावायाला सासरच्यांनी बेदम मारहाण करीत कुऱ्हाडीसारख्या वस्तूने त्याच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथे योगेश शांतीलाल पाटील (वय ३३) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. योगेश पाटील व त्यांची पत्नी यांच्या गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे माहेरी मुलासह निघून आलेली होती. दरम्यान, शनिवारी रात्री साडेआठ वाजता योगेश पाटील हा त्याचा मित्र याच्यासोबत मुलाला भेटण्यासाठी कुसुंबा येथे आलेला होता. त्यावेळी योगेश पाटील यांना त्याचे सासरे विकास नथ्थू चोपडे, शालक विशाल विकास चोपडे आणि माम सासरे प्रविण यांनी शिवीगाळ करत कुऱ्हाडीसारखी लोखंडी वस्तूने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत खिश्यातील दोन मोबाईल आणि रोकड गहाळ झाले.
याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.