धुळे (वृत्तसंस्था) निवृत्त प्राचार्य असलेल्या सासऱ्याकडून धुळे माहेर असलेल्या संगणक अभियंता सूनेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित सूनेनेच धाडस करत स्वतःवरील लैंगिक अत्याचाराचे व्हीडीओ चित्रण करून तिने अन्यायाला वाचा फोडली. या प्रकरणी सासऱ्यासह सासू व पतीला देवपूर पोलिसांनी अटक केली आहे.
अमरावती येथील अभियंता (रा. सृष्टी विजय कॉलनी) याच्याशी येथील पीडित तरुणीचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला. दोघेही पुणे येथील आयटी कंपनीत नोकरीला आहेत. सासरा हा निवृत्त प्राचार्य असून सासू ही निवृत्त शिक्षिका आहे. कोविडमुळे अभियंता पती-पत्नीचे घरातूनच काम सुरू होते. त्यामुळे सर्व कुटुंबीय अमरावती येथे राहात होते. पुणे येथील मगरपट्टा परिसरातही त्यांचे स्वतःचे घर आहे.
तुझे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, अशी खोटीनाटी धमकी देऊन सूनेला धमकावत सासऱ्याने तिच्यावर प्रथम धुळे (Dhule) येथे माहेरी तिच्याच घरात लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या पतीला घटस्फोट द्यायला सांगेल, असेही सासऱ्याने धमकावले. त्यामुळे असहाय्य पीडित सून गप्प राहीली. त्यामुळे सासऱ्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत गेली. त्याने सूनेवर अमरावती, पुणे येथे घरीच वर्षभर लैंगिक अत्याचार केलेत. हा प्रकार पतीसह सासूला सांगितल्यानंतर त्यांनी तिलाच खोटे ठरवून त्रास देणे सुरूच ठेवले.
स्वतः केले व्हीडीओ चित्रण
पीडित सूनेने धाडस करत सासऱ्याकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे व्हीडीओ चित्रण केले. तो व्हीडीओ तिने पतीसह सासूला दाखविला. मात्र, तिघांकडून पीडित सूनेचा आणखी छळ सुरू झाला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास कायमस्वरूपी माहेरी पाठवू, अशी धमकी सासरच्या तिघांनी दिली. कोरोना ओसरल्यानंतर एप्रिलमध्ये कंपनी सुरु झाल्यावर तिने कंपनीत नोकरीला जाण्याच्या बहाण्याने पुण्यातील डॉक्टर मामाला सासऱ्याकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा व्हीडीओ दाखविला. हा प्रकार पाहून मामादेखील हादरले. त्यांनी पीडितेला तत्काळ धुळ्यात आणले. तसेच तिला देवपूर पोलिस ठाण्यात नेले. व्हीडीओ पाहून पोलिस सुन्न झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी सासरा, सासू व पती यांना पुणे येथून अटक करत सोमवारी सायंकाळनंतर येथे आणले.