मँचेस्टर (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट टीमच्या सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणारी टेस्ट होण्याची आशा वाढली आहे. मात्र याचवेळी टीम इंडियामध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. टीमचे ज्यूनिअर फिजियो योगेश परमार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र आता भारतीय संघालाच हा सामना खेळण्यामध्ये फारसा रस नसल्याची माहिती समोर येत आहे.
गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचं उर्वरित पर्व खेळवलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंनी संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसा उत्साही नसल्याचं म्हटलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते. सोमवारी संपलेल्या कसोटीसामन्यापर्यंत परमार या खेळाडूंसोबतच होते.
भविष्यामध्ये काय होणार आहे यासंदर्भात खेळाडूंच्या मनात भीती आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो ही सुद्धा चिंता खेळाडूंच्या मनात असल्याचं चर्चेदरम्यान दिसून आलं. भविष्यामध्ये एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास आयपीएलमधील सहभाग आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकामध्ये खेळण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतील असं खेळाडूंना वाटत आहे. एका स्पोर्टसने दिलेल्या वृत्तानुसार नियोजित वेळापत्रकानुसार कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ईसीबीने ही घोषणा केली असून भारतीय चमूमध्ये परमार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आलेली नाही असं ईसीबीने स्पष्ट केलं आहे.
५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेली दुसरी टेस्ट भारताने जिंकली, तर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पुनरागमन केलं. यानंतर ओव्हलमध्ये झालेली चौथी टेस्ट भारताने जिंकली.