जळगाव (प्रतिनिधी) तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवून निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ऑनलाईन स्वीकारलेल्या ३१ लाख ५० हजार रुपयांपैकी १० लाख रुपये रोखण्यात आले आहे. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशाने संबंधितास परत दिली जाणार आहे. डिजिटल अरेस्ट दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने तीन बँक खात्यावर एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले होते अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दिल्ली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत एका अज्ञाताने निवृत्त वैद्यकीय अधिकारी प्रकाश बाबुलाल शिंपी (७३, रा. फुले कॉलनी, चाळीसगाव) यांना डिजिटल अरेस्ट दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने तीन बँक खात्यावर एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, पोउनि मुस्तफा मिर्झा, पोहेकॉ दिलीप चिंचोले यांनी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार करून १० लाख रुपये रोखले (होल्ड) आहे. कस्टम, सीबीआय, ईडी व अन्य यंत्रणांच्या नावाने कॉल आला व त्यांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखविली तरी त्याला बळी पडू नये तसेच अन्य कोणत्याही निमित्ताने पैशाची मागणी केल्यास आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
















