जळगाव (प्रतिनिधी) चार महिन्यांपुर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा सासरच्यांकडून छळ केला जात होता. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या मयुरी गौरव ठोसर (वय २३, रा. सुंदरमोती नगर) या विवाहितेने वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. जो पर्यंत सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल होवून त्यांना अटक होणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतला होता.
बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मूळ रहिवासी असलेल्या मयुरीचा यांचा विवाह दि. १० मे रोजी शहरातील सुंदरमोती नगरातील गौरव ठोसर यांच्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतरच सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या कारणांवरुन विवाहितेचा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. इतकंच नव्हे, तर तिच्याकडून पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा पती गौरव हादेखील तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात केला. यावेळी विवाहितेच्या माहेरच्यांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला होता.
टोकाचा निर्णय
बुधवारी दुपारच्या सुमारास घरात कुणी नसताना मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत विवाहितेला मृत घोषित केले.
सासरच्यांवर आरोप अन् मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
मयुरीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच विवाहितेचे माहेरचे मंडळी जळगावला येण्यासाठी निघाले. गुरुवारी सकाळी ते जळगावात आल्यानतर त्यांनी मुलीचा मृतदेह बघताच एकच आक्रोश केला. आपल्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत, त्यांनी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला होता.
कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
लग्नाला चार महिने झालेले असतांना विवाहितेने छळाला कंटाळून आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या माहेरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जोपर्यंत या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होऊन, अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्विकारणार असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाचेवातावरण निर्माण झाले होते.
वाढदिवसाचा आनंद काही तासांपुरताच
मंगळवारी मयुरीचा वाढदिवस असल्याने तिच्या भावाने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले होते. त्यानुसार मंगळवारी सासरच्यांनी तिचा वाढदिवस साजरा देखील केला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी दुपारच्या सुमारास विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
















