जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात जुन्या वादातून घरातील कुटुंबावर चॉपर, कोयता आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज रविवारी, दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मुकेश रमेश शिरसाठ (वय २६) आहे, जो पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी होता. सात ते आठ जणांनी त्याच्या कुटुंबावर चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठीने हल्ला केला. या हल्ल्यात निळकंठ सुखदेव शिरसाठ (वय ४५), कोमल निळकंठ शिरसाठ (वय २१), निळकंठ शिरसाठ (वय २५), ललिता निळकंठ शिरसाठ (वय ३०) आणि सनी निळकंठ शिरसाठ (वय २१) हे गंभीरपणे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
मुकेश शिरसाठ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, आणि त्याच्या निधनामुळे रुग्णालयात कुटुंबीयांच्या तणावपूर्ण स्थितीत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. या घटनेनंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच, जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.