पाटणा (वृत्तसंस्था) बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ३ टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बिहारच्या ३८ जिल्ह्यांमधील ५५ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. प्रामुख्यानं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात पाच पक्षांच्या महागठबंधन यांच्यात लढत असली तरी स्वबळावर लढणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीकडेही लक्ष असेल.
बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अवघ्या तिशीतले तेजस्वी यादव आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे प्रचंड अनुभवी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील लढतीचा फैसला आज होत आहे. दरम्यान, एक्झिट पोलने तेजस्वी यादव यांना पसंती दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताबदल होणार का, याचीच उत्सुकता आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी सत्तांतराचा अंदाज वर्तवला असताना मतमोजणी केंद्रांवर तणाव वाढण्याची भीती निवडणूक आयोगाला वाटतेय. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी केंद्रीय पोलिसांची पथकं तैनात करण्यात आलीयेत. तेजस्वी यादव वैशाली जिल्ह्यातल्या राघोपूरमधून तर त्यांचे थोरले बंधू तेजप्रताप समस्तीपूर जिल्ह्यातल्या हसनपूरमधून निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेत असलेले नितीश कुमार स्वतः लढत नसले, तरी त्यांच्या अर्धा डझन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
















