जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर २५ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी उसळलेल्या गर्दीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अखेर ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २५ मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. अंत्यसंस्काराला जळगाव शहरासह जिल्ह्यातील मान्यवर नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती सुध्दा होती. यात सध्या सुरू असणार्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करण्यात आले होते. यामुळे प्रशासन याप्रकरणी कारवाई करणार का ? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल अॅक्टीव्हीस्ट दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने ट्विटरवरून प्रशासनाला विचारला होता. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टॅग केले आहे.
दरम्यान, दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकामध्ये एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक आणि फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांच्यासह अन्य ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक व्ही. डी. ससे व उपनिरिक्षक अमोल कवडे हे करीत आहेत.