जळगाव (प्रतिनिधी) सीएसआर फंड प्राप्त करून शेततळ्याचे कामे मिळवून देतो असा बनाव करून अजय भागवत बढे यांची ४५ रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी.पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य ७ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजय बढे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचे शेततळ्याचे कामे करण्यात येत आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी निवृत्त वरिष्ठ अभियंता श्री.व्ही.डी.पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय बढे यांना शेततळ्याचे कामे मिळवून देतो असे आमिष देवून ४५ लाख रुपये घेवून फसवणूक केली होती.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक राजकुमार यांची भेट तक्रार केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी सदर तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. मात्र, या प्रकरणी फक्त दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे अजय बढे यांना कळविण्यात आले होते.
आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्णयाविरुद्ध अजय बढे यांनी जळगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती.न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेवून व्ही. डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.मात्र,कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.या प्रकरणी अपर जिल्हा न्यायाधीश न्या.एस.आर.पवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अपर जिल्हा न्यायाधीश न्या. एस.आर.पवार यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णय कायम ठेवून निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामानंद नगर पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.
रामानंद नगर पोलिस ठाणे न्यायालयाच्या आदेशाने अजय बढे यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली असून तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता श्री. व्ही. डी.पाटील, यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन, गोल्ड रिव्हर कंपनी ( मुंबई)चे सूर्यवीर चौहान, सनदी लेखापाल सुहास भट (मुंबई), व्ही.के.जैन,पवन कोलते,ललित चौधरी, पंकज नेमाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अजय बढे यांच्या तर्फे ॲड. धीरज अशोक पाटील यांनी तर व्ही.डी.पाटील व सहकाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी कामकाज पाहिले.
सीएसआर फंडाच्या माध्यमातून शेततळ्याचे काम मिळवून देतो असे आमिष दाखवून अजय बढे यांची व्ही.डी पाटील व सहकाऱ्यांनी संगनमताने नियोजनबद्ध कारस्थान रुचून ४५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. सीएसआर फंड मिळवण्यासाठी संबंधितांनी अजय बढे यांना चंदिगड, मुंबई याठिकाणी नेवून शेततळ्यांच्या कामासाठी सीएसआर फंड मिळत आहे असा बनाव निर्माण केला होता. या प्रकरणातील आरोप असलेले व्ही. डी. पाटील हे मोठे प्रस्थ असून ते राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त देखील होते.त्यांचे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत स्नेहपूर्ण संबंध आहेत. याप्रकरणात श्री सुहास भट, पवन कोलते, व व्ही.के. जैन हे तिघेही सनदी लेखापाल असून श्री गोकुळ महाजन हे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाघुर धरण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर व्ही. डी. पाटील यांचे परिचित सूर्यवीर चौहान हे गोल्ड रिव्हर कंपनीचे संचालक असून ललित चौधरी व पंकज नेमाडे हे दोघेही व्ही.डी. पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी आहेत.