जळगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या केळी महामंडळाबाबत निर्णय होत नव्हता. या अनुषंगाने आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा याबाबत मुद्दा उपस्थित करत महामंडळाच्या घोषणेसह सरकारने निधी द्यावा अशी मागणी केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ही मागणी मान्य करत तब्बल १०० कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी हा ऐतीहासीक निर्णय असून यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून केळीचे उत्पादन घेणे शक्य होणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे.
जळगावातील पोलीस कवायत मैदानावर आज शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तर याला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव आणि बुलढाण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री ना. दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, खा. रक्षाताई खडसे, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. लताताई सोनवणे, माजी आमदार चंदूभाई पटेल, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिकात्मक पध्दतीत लाभांचे वाटप करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी महत्वाच्या असणार्या केळी महामंडळाच्या घोषणेसह यासाठी किमान १०० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली. तसेच शेळगाव धरणावरील उपसा जलसिंचन योजनांसह जिल्ह्यातील योजनांना निधी मिळण्याची मागणी केली. ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतातून केळी उत्पादकांना दिलासा देण्यासह कपाशीचे भाव वाढून मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकार जनहिताची कामे करत असून जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनांसह अन्य कोणत्याही कामांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. निम्न ताप्ती प्रकल्पाला लवकरच सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारने शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रणालीचे एक दमदार पाऊल टाकले असल्याचे नमूद केले. तसेच ना. गुलाबराव पाटील यांनी मागणी केल्यानुसार केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येत असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून केळी महामंडळ स्थापनेसाठी पाठपुरावा केला आहे. गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी पाळधी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता गुलाबभाऊंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना साकडे घातले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्याने लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार आहे.
जळगाव जिल्हा हा केळीचे आगार समजले जात असून जिल्ह्यातील तब्बल ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होत असून यातून वार्षक सहा हजार कोटींची उलाढाल होत असते. केळी विकास महामंडळामुळे शेतकर्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून केळी उत्पादन घेता येणार आहे. यामुळे आजचा दिवस हा जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी ऐतीहासीक ठरला आहे.