मुंबई (वृत्तसंस्था) आज हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक (Assembly Speaker Election) घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचं ठरवलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोशियारी आक्षेपांना न जुमानता विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची राणाभीमदेवी थाटात घोषणा करणारे कॉंग्रेसचे नेते तोंडावर आपटणार असल्याचे आज मंगळवारी दुपारी स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यपालांच्या विरोधात न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार या वादात सध्या तरी राज्यपालांची सरशी झाली आहे.
राज्यपालाची संमती नसली तरी निवडणूक घेण्याच्या हालचालींवरून कायदे तज्ज्ञांनी ठाकरे सरकारचे कान टोचले असून, अशा पध्दतीने निवडणूक योग्य ठरणार नसल्याचा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला बॅकफूटरवर यावे लागले आहे. विधानसभेच्या आज जाहीर शेवटच्या दिवसाच्या वेळापत्रकात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नव्हता. तरी सरकार अचानकपणे निवडणूक घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र तसे घडले नाही.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्तऐवजी आवाजी मतदानाने घेण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारचा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर सरकारमधील नेत्यांच्या भेटीनंतर आवाजी मतदान घटनाबाह्य असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावरून राज्यपाल ठाकरे सरकारमध्ये पत्रव्यवहार सुरूच राहिले होते. सरकारने तब्बल तीन वेळा राज्यपालांना या संदर्भात पत्र पाठविले होते. त्यास राज्यपालांनी न जुमानता बारा आमदारांचे निलंबन, निवडणूक पद्धत बदलण्याची गरज काय, असे प्रश्न उपस्थित केले होते.
त्यानंतरही राज्यपाल बाजुला करून निवडणूक घेण्याची तयारी दाखवून काँग्रेस नेत्यांनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यावर बैठकांचा सपाटा घेतल्याचे बोलले गेले. त्यानंतर मात्र, राज्यपालांच्या परवानगीला डावलून अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही. तसे पाऊल न उचलण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मात्र आपला हिरमोड झाल्याचे दाखवून काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्ष भाजप नेत्यांनी राज्यपालांचे कान भरल्याने ही निवडणूक होऊ शकलेली नसल्याचा आरोप करीत काँग्रेसने आपल्यावरील बदनामीचे बालंट भाजपवर ढकलले.