जळगाव प्रतिनिधी । शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकार्यांना आमदार सुरेश भोळे यांनी केल्या. या वेळी पालिका व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांमध्ये समन्वय घडवून आणत स्पॉट व्हिजीट करण्यात आली.
शहरातून जाणार्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येत असून शहरात दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, प्रभात चौकासह शिव कॉलनी कामाला गती देण्यात आली आहे. दरम्यान, या कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांची सध्या प्रचंड दुर्दशा झाली आहे. शहरातील असंख्य वाहनधारक दिवसभरात महामार्गाने प्रवास करीत असतात. खड्डयातून वाट काढत असतांना आरोग्याच्या समस्या शहरवासियांना उद्भवत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने काल दुपारी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकार्याांनी महामार्गाची स्पॉट व्हिजीट केली.
या वेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेविका गायत्री राणे, शहर अभियंता डी.एस.खडके व नहीचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा उपस्थित होते. महामार्गावर ज्या ठिकाणी क्रॉसिंगचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूने रस्त्यांची झालेली दुर्दशा व त्यामुळे उद्भवणार्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी तातडीने खड्डे बुजवून वाहतुकी योग्य रस्ता तयार करण्याची सूचना नहीच्या अधिकार्यांना करण्यात आली.