हिंगोली (वृत्तसंस्था) एक थरारक घटना हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. येथील एका उपसरपंचाने गुप्तधन मिळवण्याच्या हव्यासापोटी एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Farmer brutal murder) केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल (FIR lodged) झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
रामदास कुंडलिक झुंगरे असं अटक केलेल्या 46 वर्षीय आरोपीचं नाव असून तो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. तर शिवाजी जनार्दन काटकर असं हत्या झालेल्या 48 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवाजी काटकर आणि आरोपी रामदास झुंगरे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. माझ्या घराकडे का पाहतोस, या कारणातून मृत शेतकरी काटकर यांनी आरोपी झुंगरे याला शिवीगाळ केली होती. यामुळे आरोपीच्या मनात शिवाजी काटकर यांच्याबद्दलचा राग खदखदत होता. तसेच काटकर यांना कसल्यातरी गुप्तधनाबद्दल माहिती आहे, असा समज आरोपीला झाला होता.
त्यामुळे आरोपीनं शिवाजी काटकर यांना जीवे मारण्याचा आणि त्यांना माहीत असलेले पैसे आणि सोनं काढून घेण्याचा कट रचला. त्यासाठी आपल्या काही साथीदारांची मदत देखील घेतली. ठरल्यानुसार आरोपीनं शिवाजी काटकर यांची निर्घृण हत्या केली. हत्येची घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या घटनेचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून अन्य आरोपींची नावंही सांगितले आहेत.