नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत उत्तर दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर नशीब अजमावणारे कन्हैया कुमार यांना प्रचारादरम्यान मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हार घालण्यासाठी पुढे आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली व त्यांच्यावर शाईसुद्धा फेकली.
देशभरात निवडणूक प्रचार जोरात सुरू असतानाच ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार कन्हैया कुमार उत्तर दिल्ली मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. दिल्लीतील न्यू उस्मानपुरा येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाला कन्हैयांनी भेट दिली. यावेळी आपच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते स्थानिक नगरसेविका छाया शर्मा यांच्यासोबत बाहेर आले. यावेळी पुष्पहाराने स्वागत करण्यासाठी एक व्यक्ती पुढे सरसावला व त्याने कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लगावण्यास सुरुवात केली. त्याने कन्हैय्यांवर शाईसुद्धा फेकली. या प्रकारानंतर कन्हैयांच्या समर्थकांनी हल्लेखोर युवकाला पकडले व बेदम चोप दिला. यात तो किरकोळ जखमी झाला आहे.
कन्हैया कुमार यांच्यासोबतच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात, आपच्या महिला नगरसेविका छाया शर्मा यांनाही हाणामारी झाल्याचे दिसत आहे. या घटनेवरून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, स्वतःवर हल्ला झाल्यानंतर कन्हैया कुमार यांनी प्रतिद्वंदी भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर जोरदार पलटवार केला. तिवारींना पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी गुंडांना हाताशी धरून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप कन्हैयांनी केला. भाजप ‘४०० पार’ नव्हे तर लोकशाही संपवण्याची तयारी करीत आहे. पण, आमचा सामना अन्यायाशी होत आहे. मी अजिबात घाबरणार नाही, असे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे. तर, कथित ‘तुकडे तुकडे’चा नारा देणाऱ्याला मी शिक्षा दिली. ‘अफजल तेरे कातिल जिंदा है’, असे म्हणणाऱ्या कन्हैयाला चापट मारून उत्तर दिले, असे हल्लेखोराने एक व्हिडिओ संदेश जारी करीत म्हटले आहे.