मुंबई (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांचा विजय झाल्यावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेच्या परिसरात अभूतपूर्व गोंधळ घातला. या हिंसेच्या निमित्ताने शिवसेनेनं ट्रम्प यांच्याबरोबरच मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. असं म्हणत शिवसेनेनं टोला लगावला आहे.
शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून अमेरिकेत उफाळून आलेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चिमटे काढले आहेत. “निवडणुकीचा निर्णय फिरविण्यात यावा यासाठी प्रे. ट्रम्प यांनी यंत्रणेवर दबाव आणला. भ्रष्टाचाराचे मोह निर्माण केले, पण यापैकी एकही यंत्रणा ट्रम्प यांना बधली नाही. ट्रम्प यांनीच नेमलेले हे सर्व लोक होते. पण त्या सगळ्यांनी अमेरिकेच्या संविधानाशीच आमची बांधीलकी असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व प्रयोग कोसळले तेव्हा एखाद्या गुंडाप्रमाणे ट्रम्प यांनी लोकांना चिथावणी दिली. ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला. अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे. याच ट्रम्प यांच्या उपस्थितीत ‘हाऊ डू मोदी ‘ सारखे सोहळे अमेरिकेत पार पडले. ते कमी पडले म्हणून आपल्या अहमदाबादेत ५० लाख लोकांना जमवून ‘नमस्ते ट्रम्प ‘ कार्यक्रमाची सलामी देण्यात आली. “ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. अशा शब्दात शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
“ट्रम्प यांनी आता सत्तेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे जगावर मोठे उपकारच केले म्हणायचे! हिंदुस्थानातील लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील. म्हणून प्रिय मित्र असूनही ट्रम्प यांच्या झुंडशाहीचा धिक्कार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
अमेरिका व हिंदुस्थानच्या लोकशाहीत साम्यस्थळे नाहीत. विसंगतीच जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही. प्रे. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले? अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल,” असा निशाणा शिवसेनेनं मोदींवर साधला आहे.