जळगाव , प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबईची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेला महासंघाचे सर्व संचालक, सभासद तसेच विविध जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम होते. यावेळी आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या आणि सूचना मांडल्या.
त्यांनी म्हटले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा वेळेवर हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती यंत्रणा वेळेत कार्यान्वित करावी. तसेच नोंदणीसाठी सुलभ व्यवस्था, बारदानाचा मुबलक पुरवठा आणि हमीभावासाठी केंद्राकडून वेळेत मंजुरी मिळणे अत्यावश्यक आहे.”
उपाध्यक्ष निकम यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार व नाफेडकडे बाकी असलेल्या अ वर्ग आणि ब वर्ग संस्थांचे देणे तातडीने दिले जावे, अशी मागणी पणन महासंघामार्फत करण्यात आली आहे.
सभेत यंदाच्या आर्थिक वर्षातील महासंघाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल उपाध्यक्ष रोहित निकम यांनी सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी आणि केंद्र शासनाचे आभार मानत पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले.
रोहित निकम यांनी मानले केंद्र सरकारचे आभार…
“हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा, पणन मंत्री प्रल्हाद शहा यांच्या सहकार्यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला आहे. यावर्षी ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ असून, त्याच वर्षी पणन महासंघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”
सभेच्या शेवटी आगामी वर्षासाठी कामकाजाचे नियोजन, शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या उपक्रमांची आखणी आणि सहकार क्षेत्रातील विविध सुधारणा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
















