मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा…,असे आव्हानच नीलेश राणे यांनी दिले.
दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे व त्यांचे दोन चिरंजीव आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनाही लक्ष्य केले होते. नारायण राणेंचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेडकाची उपमा दिली आहे . ‘गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करताहेत. बेडकीने बैल पाहिला ही गोष्ट आपण ऐकली असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाजच येईना. तो आता चिरका झालाय,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला नीलेश व नीतेश यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केले. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा…, असे आव्हानच नीलेश राणे यांनी दिले आहे.