जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजीनगरात राहणारे रेशन दुकानदार व माजी नगरसेवक यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून तब्बल ९ लाख १८ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (वय-५५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रेशनिंग दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण आनंदा सानप, संगीता किरण सानप, समीक्षा किरण सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश विनोदराय शुक्ला रा. मुंबई आणि दिवाकर राय रा. दिल्ली या पाच जणांनी वेळोवेळी नवनाथ दारकुंडे यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने ९ लाख १८ हजार ५०० रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार केली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पीएसआय महेश घायतड हे करीत आहे.