मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे चाळीसगाव तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल याचे राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गट यात सोशल मिडीयावर शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकामागे एक विकास कामांचा झंझावात सुरु असतानाच महाविकास आघाडीला धक्के देणे सुरु ठेवले आहे.
बोढरे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच बंजारा समाजाचे जेष्ठ नेते श्री.रामदास रायसिंग जाधव यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तालुकाभरात रामदासभाऊ म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पद तसेच बोढरे गावाचे सरपंचपद देखील भूषविले आहे. सदर प्रवेश प्रसंगी माजी पं.स.सभापती विजय झामसिंग जाधव, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस भावेश कोठावदे, तालुकाध्यक्ष गोरख राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेला हा मोठा धक्का मानला जात असून बंजारा समाजातील एक मोठा चेहरा पक्षातून गेल्याने आगामी निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सर्व समाजांना सोबत घेत तालुका विकासाचे व्हिजन – रामदास जाधव
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या ४.५ वर्षाच्या कारकिर्दीत तालुक्यातील अनेक कठीण अशी विकासकामे मार्गी लावली आहेत. बंजारा समाजाला संत सेवालाल महाराज भवन, अनेक तांडे वस्ती यांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्ते, पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे. आमदार मंगेशदादा यांच्याकडे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जात तालुक्याच्या विकासाचे व्हिजन आहे, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच मतदारसंघाला निधी मिळवून देण्यासाठी त्यांचे सरकार दरबारी वजन आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया रामदास रायसिंग जाधव यांनी दिली.