मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
विश्वनाथ महाडेश्वर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. त्यांनंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल. दरम्यान, विश्वनाथ महाडेश्वर हे त्यांच्या गावावरून परत आल्यानंतर सोमवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. त्यानंतर तात्काळ महाडेश्वरांना व्हि एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच ठिकाणी महाडेश्वरांचा मृत्यू झाला आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने महाडेश्वरांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांकडून समोर येत आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह इतर शिवसैनिक उपस्थित राहतील.
दरम्यान, महाडेश्वर 2017 ते 2019 काळात मुंबईचे महापौर होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं होते. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मतदार संघ आहे.