जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. राज्य सरकारने एक दिवस राज्यात शोक जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहाडिया यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
पहाडिया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री अशा अनेक पदांवर काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने राजस्थानच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट करत त्यांचं दु:ख व्यक्त केलं आहे.
गेहलोत यांनी ट्वीट केले की, ‘राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. पहाडीया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये होते.’ गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, पहाडीया कोरोनामुळे आमच्यातच राहिले नाहीत. त्यांच्या मृत्यूने मला धक्का बसला. तसेच माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
पहाडिया यांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला
पहाडिया यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी ट्वीट केले की, “राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. आपल्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सबलीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना”