जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील श्री प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या सुधारित बांधकाम व अकृषिक परवानगीसाठी बनावट दस्तावेज सादर केले. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश मधुकर पाटील (वय ५६, रा. विद्युत कॉलनी) यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील श्री प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या सुधारित बांधकाम व अकृषिक परवानगी याची सत्यता पडताळणी करण्यासंदर्भात ललित मदनलाल लोढा (रा. पहूर पेठ, ता. जामनेर) यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार नगररचना विभागाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेली सुधारित बांधकाम व अकृषिक परवानगी देण्याबाबतचे शिफारस पत्र व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
मयत झालेल्या सहा. संचालकांनी केली स्वाक्षरी
उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधील काही कागदपत्रे नगर रचना विभागाकडून दिलेले नसल्याचे लक्षात आले तसेच काही कागदपत्रातील स्वाक्षरींमध्येही बदल आहे. विशेष म्हणजे सन २०१८ मध्ये मयत झालेल्या सहाय्यक संचालकांची स्वाक्षरी देखील करण्यात आल्याचे आढळून आले.
शिफारस पत्रासह स्वाक्षरही खोट्या
शैक्षणिक प्रयोजनार्थ सुधारित बांधकाम व अकृषिक परवानगी देण्याचे शिफारस पत्र बनावट व खोटे असून त्यावरील सह्या देखील खोट्या असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यासह अनेक तफावतींचाही उल्लेख फिर्यादीमध्ये केलेला आहे.