चोपडा (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली होती. गुप्त माहितीच्या आधारे चोपडा पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कुवरसिंग गंगाराम खरते (वय 23 रा. गुडागांव ता. वरला जि. बडवाणी,मध्यप्रदेश) आणि सियाराम पांडीया जुकटे (वय 19 रा. कुडवाझिरा ता. सेंधवा जि. बडवाणी,मध्यप्रदेश) असे अटकेतील संशयित आरोपींचे नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, दि. ११ रोजी संध्या ६ वाजेच्या सुमारास महात्मा गांधी कॉलेज जवळ महालक्ष्मी नगर चोपडा येथील राहणारी एक महीला पायी फिरत असतांना एका मोटार सायकलवर दोन अज्ञात चोरट्यांनी सुवर्णा राजेंद्र सैदाने (वय ५२, रा. महालक्ष्मी नगर, यावल रोड, चोपडा) गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाची सुमारे १ लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला होता. महिलेने आरडा ओरड केली तोपर्यंत दोघे दुचाकीने पसार झाले होते. संशयित आरोपींनी धरणगावच्या दिशेने पोबारा केला होता. सदर घटनेची पोलीसांना माहिती मिळताच सहा.पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले ,चोपड़ा तसेच पोलीस निरीक्षक के.के.पाटील व स.पो.नि संतोष चव्हाण,पो.उ.नि घनशाम तांबे, पो.हे.कॉ विलेश सोनवणे, पो.कॉ. मिलींद सपकाळे व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन सैंदाणे यांच्याकडून घटनेबाबत सविस्तर विचारपुस हकीगत जाणून घेतली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ धरणगाव आणि शिरपुर रोडवर नाकाबंदी करून आरोपींचा वेले निमगव्हाण गावापर्यंत शोध घेतला. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांनी सांगीतलेल्या वर्णनाप्रमाणे सुतगिरणी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करुन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आरोपींबाबत कोणतीही उपयुक्त माहीती मिळाली नव्हती.
काही दिवसांनी सदरचा गुन्हा हा वरला व सेंधवा (मध्यप्रदेश) या ठिकाणी राहणाऱ्या आरोपींनी केल्याबाबत माहीती मिळाल्यानंतर स.पो.नि संतोष चव्हाण, पो.नाईक संतोष पारधी, पो.को. लव सोनवणे यांचे पथक सेंधवा येथे रवाना करुन सेंधवा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने आरोपी नामे कुवरसिंग गंगाराम खरते आणि सियाराम पांडीया जुकटे या संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर दोघं संशयित आरोपींनी जबरीने चोरुन नेलेली सोन्याची पोत आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल काढून दिली. संशयितांना आज रोजी चोपडा न्यायालया हजर केले असता त्यांना दि. 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
सदर गुन्ह्यातील अटक आरोपीतांनी यापूर्वी लासलगाव, नाशिक ग्रामीण तसेच पुणे शहर व पाचोरा तालुक्यात मजुरी काम केलेली आहेत. त्याठिकाणी देखील आरोपीतांना अशा प्रकारचे गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतही चोपडा पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये व चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व सहा.पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांच्या व पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि संतोष चव्हाण व पो.हे.कॉ प्रदीप राजपुत व पथक हे करीत आहेत.