जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पत संस्था ( ग.स. सोसायटी )आज आपल्या प्रदीर्घ अखंडित वाटचालीची 113 वर्षे पूर्ण करून दैदीप्यमान किर्तीसह 114 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जळगाव जिल्ह्याची सर्वात पहिली जिल्हाव्यापी संस्थेचा मान याच संस्थेकडे जातो.
ही केवळ एक संस्था नसून 40 हजारांपेक्षा जास्त सभासदांचा कौटुंबिक आर्थिक आणि तो ही हक्काचा आधारवड म्हणून सिद्धता प्राप्त करून आहे. आपल्या शतकोत्तरी वाटचालीत अतिशय दिमाखाने ही संस्था वैभवी लौकिकार्थाने सभासदांचा विश्वास संपादन करून उभी आहे. वर्धापन दिनानिमित्त सभासद आणि संचालक मंडळास शुभेच्छा…!
जळगाव जिल्ह्याच्या सहकार चळवळीचा इतिहास पाहाता तत्कालीन भुसावळ तालुक्यातील बोदवड येथे 1904 मध्ये पहिली सहकारी संस्था स्थापन झाली. सन 1906 मध्ये जळगाव जिल्ह्याची निर्मिती झाली त्या नंतर तीन वर्षांनी म्हणजे 15 डिसेंबर 1909 रोजी ग.स. सोसायटी रजिस्टर झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ही खूप आधी ही संस्था अस्तिवात आली. आपल्या प्रदीर्घ वाटचालीत या संस्थेने आपल्या संस्थेच्या सभासदांचे हित सर्वोतोपरी मानून आपली वाटचाल सुरूच ठेवली. विशेष म्हणजे ही लेखा परीक्षणात कधी ही “अ” वर्गाच्या खाली आलीच नाही. कोणताही पक्ष, समुदाय गट असा अभिनिवेश न बाळगता ‘सर्वे सुखीनाह; सन्तु’ हे तत्व बाळगत प्रत्येक सभासदास न्याय देत कार्यरत आहे. संस्थेचं नेतृत्व देखील समाजाभिमुख आणि कल्याणकारी वृत्तीचे या संस्थेला लाभले. त्यात गेल्या वीस, पंचवीस वर्षांचा विचार करता बी.बी. आबा पाटील, हणमंतराव पवार, बाळासाहेब चव्हाण, श्रीनिवास पाटील, एस.एस.पाटील, अशी किती तरी नावे कुशल नेतृत्व म्हणून घेता येतील. या संस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक चुरशीच्या होतात. मात्र, एकदा निकाल लागला की, त्यात फार राजकारण सत्ताधारी किंवा विरोधक फारसे करीत नाही. मात्र वार्षिक सर्व साधारण सभा तेवढ्या गाजतात, त्याकडे जिवंतपणाचे किंवा जागृकपणा म्हणून बघता येईल.
उदय पाटलांचा विक्रम
या संस्थेचं वैशिष्ठ्य म्हणजे विद्यमान चेअरमन उदय मधुकर पाटील 1998 पासून सलग पाच वेळा संचालक म्हणून निवडून येत आहेत. दोन टर्म चेअरमन आणि तीन वेळा व्हाईस चेअरमन निवडले गेले, हा देखील विक्रमच म्हणावा लागेल. अर्थात सर्व समावेशक विचारसरणी आणि संस्थेबद्दलची आस्था हे त्या मागचे कारण असेल. उदय पाटील यांची कार्यशैली गट, तटा पलीकडची असल्याचे अनुभवास येते.
जिंदगीके साथ भी और जिंदगी के बाद भी…!
114 व्या वर्षात पदार्पण करीत असतांना या संसंस्थेने एक फारच जगा वेगळा उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आहे. ज्याची नोंद इतिहासाला ही घ्यावी लागेल. आपल्या राज्यातीलच नव्हे तर देशातील ही पहिली संस्था असेल, जिने मयत सभासदांकडील शंभर टक्के कर्ज माफीचा निर्णय मागच्याच महिन्यात घेतला. या निर्णयाला उदय पाटील सत्ताधारी गट वचनांची पूर्तता असं म्हणत असला, तरी त्यांचा हा निर्णय ‘जिंदगीके साथ भी और जिंदगीके बाद भी’ या उक्तीची जाणीव करून देणारा वाटत आहे. मयत सभासदांच्या कुटुंबियांची तसेच जामीनदार सभासदाची कर्जाच्या बोझ्यातून मुक्ती व्हावी, हा त्या मागचा हेतू आहे. मयत सभासदावरील साडेसहा लाख ते 15 लाख पावेतोचे संपूर्ण शंभर टक्के कर्ज माफ करण्याची योजना लागू करून नवा अध्याय प्रस्थापित केला गेला आहे.