नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात एकीकडे विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमध्ये राजकीय धुराळा उडत आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेशात वातावरण चांगलेच तापले आहे. मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, प्रचारात आरोपप्रत्यारोप जोरात सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांचे सर्वस्व पणाला लागलेले आहे. दरम्यान, एका प्रचारसभेत ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे याचा विसर पडल्याचे दिसले कारण त्यांनी भरसभेत जनतेला चक्क काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरून चिमटे काढले आहेत.
काँग्रेस सोडून काही महिने लोटले तरी, भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचा विसर पडलेला नाही, असेच दिसत आहे. पोटनिवडणुकीच्या एका प्रचार सभेत याची प्रचिती आली. मध्यप्रदेशात होत असलेल्या पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी झोकून दिले आहे. काँग्रेस आणि भाजपासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. याच निवडणुकीच्या प्रचारात असताना एका सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जनतेला संबोधित केले.
त्यानंतर अचानक हात उंचावत त्यांनी लोकांना आवाहन केलं की, “३ तारखेला होणाऱ्या मतदानावेळी पंजाच्या निशाणी समोरील बटन दाबून काँग्रेसला…” इतकं म्हटल्यानंतर झालेली चूक शिंदे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. पण हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेत्यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही हा व्हिडीओ ट्विट करत आदत से मजबूर असा टोला लगावला आहे. “सत्य समोर येण्यास वेळ लागते, पण ते समोर येतंच,” असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. २७ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व भाजपासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या निकालावरच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच भवितव्य अवलंबून आहे.