धरणगाव (शेहबाज देशपांडे) – सण आणि उत्सव हे आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण असतात. या काळात लोक कुटुंबीयांसोबत, मित्र-परिवारासोबत वेळ घालवतात व उत्सवाचा आनंद घेतात. मात्र, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असते. पाळधी गावात एकाच दिवशी गणेश उत्सव, गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचे जुलूस मोठ्या संख्येने पार पडले. हजारोंच्या उपस्थितीत झालेले हे दोन्ही धार्मिक उत्सव शांततेत, उत्साहात आणि गुण्यागोविंदाने पार पडले.
पोलीस प्रशासनाची चोख कामगिरी
संपूर्ण कार्यक्रम काळात धरणगाव तालुका पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी पी. आय. पवार आणि पाळधी पोलीस स्टेशनचे एपीआय खंडारे यांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे सांभाळली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत कोणत्याही उत्सवाला गालबोट लागू न देता दोन्ही सण यशस्वीरित्या पार पाडण्यात पोलीस प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली.
स्थानिक मुस्लिम संघटनेतर्फे या उत्कृष्ट नियोजनाबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले तसेच त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
समाजातील एकात्मतेचा संदेश
गणेश उत्सव, विसर्जन सोहळा आणि ईद-ए-मिलाद जुलूस एकाच दिवशी पार पडल्यानंतर गावात बंधुभाव, सलोखा आणि धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडले. पाळधी ग्रामस्थांनी परस्पर समन्वय आणि आपुलकीने उत्सव साजरे करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी माजी सरपंच अलीम देशमुख, डॉ. प्रवेज देशपांडे, पत्रकार शेहबाज देशपांडे, निसार देशमुख, अकबर पठाण, कालू खाटीक यांसह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













