जळगाव (प्रतिनिधी) पुण्याला मुलाकडे गेलेल्या अरुण लक्ष्मण शेटे (वय ६४, रा. मुकुंद नगर, लाठी शाळेच्या मागे) यांच्या घराचा दरवाजा आणि खिडकीच्या आसारी वाकवून चोरटे घरात शिरले. त्यानंतर घरातील कपाटातून परिसरात असलेल्या महादेवाच्या मंदिरातील पींडीवरील चांदीचे मुकूट, इतर देवांची मुर्ती व चांदीचे साहित्य असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. ११ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुकुंद नगरात अरुण शेटे हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त झाले आहे. त्यांचा मुलगा प्रशांत हा पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायीक झाल्यामुळे अरुण शेटे हे अधूनमधून मुलाकडे जात असतात. तसेच त्यांच्या घरासमोर महादेव मदिर असून त्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीला ७५० ग्रॅम वजनाचा तर गणपतीच्या मुर्तीला १५ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट आहे. हे मुकुट कुठल्याही सण, उत्सावासाठी वापरला जातो त्यानंतर ते अरुण शेटे यांच्या घरातील फर्निचरमध्ये ठेवले जातात. दि. २७ जून रोजी अरुण शेटे हे पत्नीसह पुणे येथे जाणार असल्याने त्यांनी मंदिरातील चांदीचे मुकुट आणि त्यांच्या घरातील चांदीचे देव आणि त्यांचे दागिने फर्निचरमध्ये ठेवून घराला कुलूप लावून ते पुण्याला गेले होते.
शेजारच्यांनी दिली चोरीची माहिती
पुण्याहून रेल्वेने दि. ११ जुलै रोजी ते घरी येण्यासाठी निघाले असता त्यांना घराशेजारी राहणारे भरत देवरे यांनी फोन करुन तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडकीच्या आसारी वाकलेल्या असल्याचे दिसत असल्याचे सांगितले.
फर्निचरच्या कपाटातून मुकुट नेले चोरुन
त्यानुसार अरुण शेटे यांनी शेजारी राहणाऱ्या भरत देवरे यांना घरात जावून पहा असे सांगितले. त्यानुसार देवरे हे घरात गेले असता, त्यांनी घरातील फर्निचरच्या कपाटात ठेवलेले चांदीचे मुकुट आणि देवघरातील चांदीचे देव दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी शेटे हे घरी परतल्यानंतर घरात पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याची खात्री झाली.