अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२३ पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत ३ लाख ८७ हजार ९२३ पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगाम २४ अखेरपर्यंतही मदत मिळालेली नाही. तर यंदा सरासरीपेक्षा अधिक व सततच्या पावसामुळे कापसासह सर्व पिके वाया गेली आहेत. यामुळे गतवर्षी दुष्काळ असूनही शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहिर केली होती, अन् यावर्षी अतिवृष्टीसह सततच्या पावसाने खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हताश झाले आहेत. त्यामुळे खरीप हंगामामधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्या, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्याना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिकांचा उत्पन्नावर आधारित जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार १२८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्यापैकी ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनीने ३ लाख ८७ हजार ९७३ विमाधारक शेतकरी पात्र केले होते. त्यासाठी इन्शुरन्स कंपनीमार्फत ५२३ कोटी २८ लाख ५ हजार ३८९ एवढ्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषि अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेवून कंपनीला निर्देश दिले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी शासनाने विमा कंपनीकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. हि रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे वृत्त जिल्ह्यातील प्रसिद्धी माध्यमातून देण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, अशी अपेक्षा होती. तथापि, गतवर्षाच्या पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट दिले होते.
जळगाव जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईचा दावा ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार उर्वरित रक्कम राज्य सरकारने देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ओरिएंटल इंडीया इन्शुरन्स विमा कंपनीला राज्य शासनाकडून ४४९ कोटी रुपये एवढी रक्कम मिळावी. यासाठी, पाठपुरावा सुरू असून ही रक्कम मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम वर्ग करण्यात येईल, असे विमा कंपनीचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३मधील पात्र शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उर्वरित बंधनकारक रक्कम नियमानुसार आवश्यक बाब म्हणून प्राधान्याने विमा कंपनीकडे वर्ग करावयाची आवश्यक कार्यवाही व खरीप हंगाम २०२४साठीच्या उपाययोजनांसह शेतकऱ्याची शासनाप्रती असंतोषाची भावना दूर करण्यासाठी शासनाने खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूनर्सन मंत्री अनिल भाईदास पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केलेली आहे.