धरणगाव (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील निमगूळ येथे दोन वर्षीय बलिकेवर झालेला अत्याचार तसेच जीवे ठार मारल्याप्रकरणी बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून याप्रकरणात असलेल्या खऱ्या गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा धरणगावच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेचा जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबत तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन धरणगाव यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमगूळ ता. जि. धुळे येथील अतिशय हलाखीची परिस्थिती असलेले प्रविण रामराव महाजन शनिवारी रात्री कुटुंबासह झोपले होते. अज्ञात व्यक्तीने माळी कुटुंबियांजवळ झोपलेल्या २ वर्षीय बालिकेवर अत्याचार करत त्या चिमुरडीला उचलून गावापासून दोन कि. मी. अंतरावरील विहिरीत फेकून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. पूर्व वैमनस्यातून खून झाला की नरबळी…? याबाबत तपास सुरू आहे.
निमगुळ येथील शेतकरी महाजन हे परिवारासोबत झोपले होते. रात्री साडे अकरा वाजता त्यांना अचानक जाग आली असता त्यांना अंथरुणावर त्यांची दोन वर्षीय बालिका दिसली नाही. सभोवतालच्या रहिवाश्यांनाही विचारले , त्याबाबत कोणीही सांगू शकले नाही. सर्वत्र शोध घेतला असता सकाळी ९ वाजता गावाजवळील दोन किमी. अंतरावरील विहिरीत बालिकेच्या मृतदेह तरंगताना दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. याला नेमकं जबाबदार कोण ?…..ज्या नराधमांनी हे कृत्य केलं त्यांना त्या चिमुकली विषयी थोडी देखील दयेची भवना वाटली नसेल का? मयत बालिकेवर नको ते कृत्य करत जीवे ठार मारल्या प्रकरणी सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत व्ही. टी. माळी, लक्ष्मण पाटील, आबासाहेब वाघ यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी , अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार सातपुते साहेब, पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष हेमंत माळी, महासचिव आकाश बिवाल, माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, समर्पण गृपचे अध्यक्ष महेंद्र तायडे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, काँग्रेसचे विकास लांबोळे, लोकमतचे प्रतिनिधी कल्पेश महाजन, मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, सामाजिक कार्यकर्ते सिताराम मराठे, मयूर भामरे, राहुल मराठे, बबलू वाघमारे, प्रकाश सपकाळे, दिपकराव सोनवणे, रामचंद्र माळी, अमोल सोनार, मयूर माळी, सागर गायकवाड, पंकज पवार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.