अमरावती (वृत्तसंस्था) आपल्या अंगात देवाची सवारी येते. पूजा व उतारा केल्यास तुला नक्की मूल होईल, मात्र, त्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून ७ जून रोजी दुपारी दर्यापूर तालुक्यातील कुकसा येथील पूर्णा नदीकाठी विवाहितेवर मांत्रिकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संतोष गजानन बावने (३०, रा. कुकसा, ता. दर्यापूर), असे भोंदू मांत्रिकाचे नाव आहे.
मुलबाळ होत नसल्यामुळे पोहचले बाबाकडे !
तक्रारीनुसार, मे २०१८ मध्ये लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यास मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे एका नातेवाइकाने त्यांना कुकसा येथील तथाकथित मांत्रिक संतोष बावने याच्याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनेतील पिडीत महिला पती व आईसह पहिल्यांदा पौर्णिमेला कुकसा येथे गेली. त्या दिवशी महाराजांच्या अंगात सवारी आली. त्यानंतर बाबाने पुढील महिन्यातील पौर्णिमेस रात्री येण्यास सांगितले.
अंगात कालीयाशेष देव असल्याची थाप !
पुढे तिसऱ्यांदा १० एप्रिलला घटनेतील दाम्पत्य कुकसा येथे गेले असता बाबांनी माझ्या अंगात कालीयाशेष देव येतो. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की मूलबाळ होईल. करणी केल्यामुळे तुला मुलबाळ होत नाही असे सांगत पूजा-अर्चा करण्यासाठी १० हजारांची मागणी केली. ती रक्कम पीडित महिलेच्या पतीने ‘फोन पे’ द्वारे दिली होती. तसेच पूजेचा खर्च म्हणून या दाम्पत्याने भोंदूबाबांना ४० हजार रुपये दिले.
अघोरी पूजा मांडली !
यानंतर पूजेची तारीख बुधवार ७ जून ही ठरवण्यात आली. बाबांच्या आदेशानुसार, हे दाम्पत्य हे दुचाकीने कुकसा येथे बाबांच्या घरी पोहोचले. दुपारी १ वाजता भोंदूबाबांनी गावाबाहेरील पूर्णा नदीकाठी दाम्पत्यास पुजेसाठी नेले. मांत्रिकाने आधीच स्वतःच्या गावातील पूर्णा नदीकाठी तथाकथित पूजेसाठी आडोसा असणारी जागा शोधून ठेवली होती. बाबांनी पूजा मांडून पुन्हा २० हजार मागितले असता पीडित महिलेच्या पतीने तेही दिले. तेथे त्याने अघोरी पूजादेखील मांडली.
पती दूर गेल्याची खात्री पटताच पिडीतेवर बलात्कार !
पूजेसाठी आवश्यक काही साहित्य मात्र, घरीच राहिले, अशी थाप मारून मला आणि तुझ्या पत्नीला पूजेतून उठता येणार नाही, त्यामुळे तू ते साहित्य घेऊन ये, असे सांगत मांत्रिकाने तेथून जाण्यास भाग पाडले. पती दूर गेल्याची खात्री पटताच त्याने पिडीतेवर बलात्कार केला. पती परतताच पत्नीने आपबीती कथन केली. त्यानंतर पीडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी भोंदू बाबाविरुद्ध बलात्कार, अॅट्रासिटी व अघोरी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
















